पुणे | सीएनजीच्या दरात ९० पैशांची वाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसदरात वाढ करण्यात आली आहे. रविवार (दि. ८) मध्यरात्रीपासून शहरात सीएनजी दरात प्रतिकिलो ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी ८५. ९० रुपये किलोने मिळणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच सीएनजी दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणत फटका सहन करावा लागत असल्याने अनेक नागरिक आता सीएनजी वाहनांकडे वळले आहेत.
पर्यावरणपूरक आणि स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक सीएनजी वाहनांची खरेदी करत आहेत. मात्र, आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) आजपासून शहरातील सीएनजी अर्थात ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ दरात वाढ करण्यात आली आहे.
सध्या शहर परिसरात सीएनजी गॅस ८५ रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. यात आता ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून एक किलो सीएनजी गॅससाठी ८५.९० रुपये मोजावे लागणार आहेत.
शहरासह पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांत ही दरवाढ लागू असणार आहे. दरम्यान, शहरात घरगुती वापरासाठी असलेल्या पाइप नॅचरल गॅसच्या किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे एमएनजीएलकडून सांगण्यात आले.
वाहनचालकांना फटका
शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन लाखांवर आहे. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर रिक्षा, पीएमपीएल बसेससह अन्य वाहनांचा समावेश आहे. यामुळे अशा वाहनचालकांना याचा फटका बसणार असून, वाढीव दराने गॅस खरेदी करावा लागणार आहे.





