अदानी फाऊंडेशनकडे राज्यातील 9 शाळा हस्तांतरित

मुंबई : राज्यासह देशातील विविध पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवसायांमध्ये आपले अस्तित्व दाखवणाऱ्या अदानी समुहाकडे आता शाळा देखील सोपवण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. अदानी फाऊंडेशनकडे राज्यातील जवळपास 9 शाळांचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय (जीआर) शालेय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील एका खासगी शाळेचा समावेश आहे.
राज्यातील नऊ शाळांचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही शाळा विनाअनुदानित असून येथे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे.
कार्मेल एज्युकेशन सोसायटी संचलित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे देण्यात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या प्रस्तावाला अटी – शर्तींसह मंजुरी देण्यात आल्याचे शासन जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांत शाळा व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.





