हैदराबाद – तेलंगणमधील श्रीशैल्यम येथील जलाविद्युत प्रकल्पामध्ये काल रात्री लागलेल्या आगीमध्ये 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रीसैलम वेस्ट बॅंक पॉवर स्टेशन या प्रकल्पामध्ये आग लागल्यावर हे सर्वजण जलविद्युल प्रकल्पातील पाणी वाहून नेण्याच्या बोगद्यामध्येच अडकून पडले होते.
आग विझवण्यात यश आल्यानंतरही प्रचंड धूरामुळे या सर्वांच्या बचावाच्या कामामध्ये अडथळे येत होते. त्यांना वाचवण्यासाठी विशेष तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र आग लागलेल्या प्रकल्पामध्ये सर्व 9 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये तिघेजण प्रकल्पातील असिस्टंट इंजिनिअर आहेत. घटनास्थळी अडकून पडलेल्या आणखी तिघाजणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या अपघाताच्या कारणांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश “सीआयडी’ला दिले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता तेलंगणचे उर्जामंत्री जी. जगदीश्वरराव रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारी रात्री या जलविद्युत प्रकल्पात आग लागली, तेंव्हा तेथे 30 कर्मचारी होते. त्यापैकी 6 जणांना बाहेर काढण्यात आले. तर 15 जण आपत्कालिन मार्गाने बोगद्यातून बाहेर पडले. मात्र प्रचंड धुरामुळे 9 जण आतच अडकून राहिले होते.