विदेश वृत्त : सीरियातील दोन गावांवर रॉकेट हल्ला; 9 ठार

बैरुत – सीरिया सरकारने बंडखोरांचा प्रभाव असलेल्या गावांवर केलेल्या रॉकेट हल्ह्यांमध्ये किमान 9 जण ठार झाले आहे. यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. सीरियाच्या ईशान्येकडील भागात हा रॉकेट हल्ला करण्यात आला असे “व्हाइट हेल्मेटस’नावाच्या बचाव आणि युद्ध निरीक्षक गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
स्वनियंत्रित क्षेपणास्त्र इडलीब प्रांताच्या दक्षिणेकडील गावात पडली. त्यामध्ये एक महिला, तिची कन्या आणि एका बालकाचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य काही जणही यावेळी जखमी झाले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते, असे “व्हाइट हेल्मेटस’ने म्हटले आहे.
पूर्व इडलीबमध्ये फो भागात खाण असलेल्या भागात रॉकेट पडल्यावर एका मुलासह सहा जण ठार झाले, हे सर्वजण खाण कामगार होते असे ब्रिटनस्थित निरीक्षक गटाने म्हटले आहे. मरण पावलेल्या एकूण व्यक्तींची संख्या पडताळून पाहता येऊ शकलेली नाही. सरकारी फौजा आणि बंडखोर गटांमध्ये मार्च 2020 पासून शस्त्रसंधी सुरू आहे. मात्र अजूनही या दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू आहे.





