140 अफगाणी प्रशिक्षणार्थी मायदेशी रवाना
पुणे – लॉकडाऊनमुळे पुण्यातील विविध संरक्षण संस्था आणि महाविद्यालयांत अडकलेल्या अफगाणिस्तातील 140 प्रक्षिणार्थींना रविवारी विशेष विमानाद्वारे मायदेशी पाठविण्यात आले. यावेळी अफगाणिस्तान येथून नऊ भारतीय नागरिक देशात दाखल झाले.
देशात विविध ठिकाणी अडकलेल्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सरकारतर्फे “ऑपरेशन स्ट्रॅंडेड’ ही मोहीम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या विदेशी नागरिकांना विशेष विमानाद्वारे त्यांच्या मायदेशी पाठविले जाते. रविवारी पुणे विमानतळावरून असेच एक विमान रवाना करण्यात आले.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) अशा विविध संरक्षण संस्थांमधील सैन्य दलाचे प्रशिक्षणार्थी तसेच सिम्बायोसिस महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय याठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी असे पुण्यातील एकूण 140 अफगाणी नागरिक, अफगाणिस्तानच्या केएएम एअरवेजच्या विमानाने मायदेशी रवना झाले. विमानात जाण्यापूर्वी या नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.