पिंपरी (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज शहरात 871 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात उपचारादरम्यान 28 जणांचा मृत्यू झाला.
रविवारी संशयितांचे अहवाल महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर 871 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शहराबाहेरील एकाही रुग्णांचा समावेश नाही. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 22,934 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये 4012 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहरात आजपर्यंत 477 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील व शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात 797 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15,479 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2444 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तर 1271 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
आकडेवारी, प्रेसनोटमध्ये तफावत
पिंपरी-चिंचवड महापालिकेने रविवारी आठजणांचा मृत्यू झाल्याचे पहिल्या प्रेसनोटमध्ये सांगत एकूण आकडेवारी 457 दिली. तर दुसरी प्रेसनोट काढून आकडेवारी 477 दिली. मात्र मयतांची संख्या 8 इतकीच दाखविली. त्यामुळे आज दिवसभरात किती जणांचा मृत्यू झाला यावर खल सुरू होता. यानंतर वैद्यकीय विभागातील विक्रम काटकर यांच्या सांगण्यानुसार व काटकर यांना वैद्यकीयकडून आलेल्या अहवालानुसार 28 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.