पिंपरी | पवना धरणात ८४ टक्के पाणीसाठा, सात दिवसात ३८ टक्क्यांची वाढ
Updated On:

पवनानगर, (वार्ताहर) – मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे तहान भागविणारे पवन मावळातील प्रमुख पवना धरण ८४ टक्के भरले आहे. दोन आठवडे झालेला समाधानकारक पाऊस आणि मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार, शुक्रवार असा सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात एकूण ८३.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. तर २४ तासात झालेल्या ३० मीमी पावसासह चालू हंगामात एकूण १८५४ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
गेल्या सोमवारपासून ते रविवारपर्यंत अर्थात सात दिवसात पवना धरणाच्या जलसाठ्यात ३८.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सात दिवसात ८८३ मीमी एवढा पाऊस झाला असून यादरम्यान बुधवारी (दि.२४) रोजी विक्रमी ३७४ मीमी पाऊस झाला.





