“फडणवीस सरकारकडून धारावी पुनर्वसनात 800 कोटींचा घोटाळा”

मुंबई – धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या 45 एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला 800 कोटी दिले. परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही. या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच या प्रकरणी एसअयटी चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती. परंतु काही कारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही.
ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सुरू केली. याकामी फडणवीस सरकारने 800 कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले. पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. यात फडणवीस सरकारने सुमारे 800 कोटी रुपयांचा घोटाळा केला असून याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी. तसेच गरज पडल्यास ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आम्ही हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…तर फोन टॅपिंग प्रकरणी कारवाई
पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते. यामध्ये त्यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत असे समोर आले आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे नाना पटोले म्हणाले0





