एमआयडीसीत स्थानिकांना 80 टक्के रोजगार

शिरूर – क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या शिरुर तालुक्‍यातील स्थानिकांना 80 टक्के रोजगार कायद्याची अंमलबजावणी करावी, या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आता शिरूर तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीत तालुक्‍यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून तसे आदेश कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्रात उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थानिकांना 80 टक्के रोजगार देण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी संदर्भात शिरुर तालुक्‍यातील ही पहिलीच घटना आहे.

शिरूर तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना 80 टक्के रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. याबाबत तीन महिन्यांपूर्वी निवासी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली होती. कागदपत्रे परिपत्रके त्यांनी उपलब्ध करून त्यांनी यासंदर्भात सरकारला व औद्योगिक वसाहतीतील प्रमुख व कामगार आयुक्त यांना जाब विचारला होता.

13 ऑगस्ट रोजी क्रांतिवीर प्रतिष्ठानने एमआयडीसी बंदचे आंदोलन पुकारले होते. याची दखल मंत्री बाळा भेगडे यांनी घेतली. त्या संदर्भात पुण्यात शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, आमदार बाबुराव पाचर्णे, सतीश पाचंगे, सागर दरेकर, बाळासाहेब लांडे, शिवाजी भुजबळ भाजपा कार्यकारिणी सदस्य राजेश लांडे, विजय दरेकर, अमोल दरेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रांजणगाव एमआयडीसीत नोंदणी केंद्र
या संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून रांजणगाव एमआयडीसीमध्ये जिल्हा उद्योग केंद्र, एम्प्लॉयमेंट विभाग व एमआयडीसी यांनी संयुक्तपणे तालुक्‍यातील तरुणांची नोंदणी करून घेण्यासाठी नोंदणी विभाग सुरू करुन तातडीने नोंदणी करून घेऊन शिरुर तालुक्‍यातील सर्व कंपन्यांमध्ये त्यांना सामावून घेण्यासंबंधी अंमलबजावणी करण्याचे आदेशच मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी दिले. एमआयडीसीमध्ये तरुणांना रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.