First Period: पहिल्यांदा मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींनी जाणून घ्याव्यात ‘या’ ८ गोष्टी; घाबरू नका, शरीरातील हा बदल आहे अगदी नैसर्गिक!
First Period पहिल्यांदाच पाळी आल्यावर अनेक मुली घाबरतात. अचानक अंतर्वस्त्रांवर लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसल्याने नेमके काय झाले, असा प्रश्न त्यांना पडतो. अशा वेळी योग्य माहिती नसल्यामुळे भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो.

First Period: मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पहिली मासिक पाळी. वयात येताना शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल घडू लागतात. त्यापैकी मासिक पाळी हा एक नैसर्गिक बदल आहे. मात्र, पहिल्यांदाच पाळी आल्यावर अनेक मुली घाबरतात. अचानक अंतर्वस्त्रांवर लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसल्याने नेमके काय झाले, असा प्रश्न त्यांना पडतो. अशा वेळी योग्य माहिती नसल्यामुळे भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे मुलींना पहिली मासिक पाळी येण्यापूर्वीच याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. पाळी म्हणजे काय, ती किती दिवस असते, पॅडचा वापर कसा करायचा आणि स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची, या गोष्टी प्रत्येक मुलीला माहीत असायला हव्यात. चला तर जाणून घेऊया पहिली मासिक पाळी येण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात अशा आठ महत्त्वाच्या गोष्टी.
१. मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे
मासिक पाळी ही मुलींच्या शारीरिक विकासाचा एक सामान्य भाग आहे. दर महिन्याला गर्भाशयाच्या आतील आवरणाची जाडी वाढते. गर्भधारणा न झाल्यास हे आवरण रक्तासह योनीमार्गातून शरीराबाहेर पडते. या प्रक्रियेला मासिक पाळी किंवा पिरियड्स असे म्हणतात. त्यामुळे पाळी येणे ही घाबरण्याची गोष्ट नसून शरीराच्या वाढीतील नैसर्गिक प्रक्रिया आहे.
२. पहिली पाळी येण्याचे वय प्रत्येक मुलीचे वेगळे असते
साधारणपणे मुलींना वयाच्या १२ ते १३ वर्षांच्या आसपास पहिली मासिक पाळी येते. मात्र, प्रत्येक मुलीच्या शरीराची वाढ वेगवेगळ्या पद्धतीने होत असल्याने पाळी सुरू होण्याचे वयही वेगळे असू शकते. साधारणपणे स्तनांचा विकास सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी पहिली पाळी येऊ शकते.
३. पहिल्या पाळीपूर्वी शरीरात दिसतात काही बदल
पहिली मासिक पाळी येण्यापूर्वी शरीरात काही बदल दिसू लागतात. स्तनांचा विकास होणे, काखेत आणि शरीराच्या इतर भागांमध्ये केस येणे, योनीमार्गातून पांढरा स्त्राव होणे तसेच पोटाच्या खालच्या भागात हलकी कळ येणे, ही त्यापैकी काही सामान्य लक्षणे आहेत.
४. पहिल्या पाळीत रक्ताचा रंग लाल किंवा तपकिरी असू शकतो
पहिल्यांदा पाळी येते तेव्हा भरपूर रक्तस्राव होईलच असे नाही. सुरुवातीला अंतर्वस्त्रांवर लाल, गडद लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसू शकतात. काही मुलींना अगदी कमी रक्तस्राव होतो. साधारणपणे मासिक पाळी दोन ते सात दिवसांपर्यंत राहू शकते.

First Period
५. सॅनिटरी पॅडचा योग्य वापर करा
पहिल्यांदा पाळी आल्यावर सॅनिटरी पॅड वापरणे सोपे ठरते. पॅड अंतर्वस्त्रांच्या आतील बाजूस व्यवस्थित लावावे. साधारण चार ते पाच तासांनी किंवा पॅड ओले अथवा भरलेले वाटल्यास ते बदलावे. पॅड बदलताना स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेची जळजळ आणि खाज यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.
६. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका
मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. योनीमार्गाच्या बाहेरील भागाची स्वच्छ पाण्याने स्वच्छता करावी. पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत. रोज स्वच्छ अंतर्वस्त्रे वापरावीत. या भागात सुगंधी साबण, परफ्यूम किंवा इतर रसायनांचा वापर टाळावा. त्यामुळे जळजळ आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
७. पोटदुखी आणि मूडमध्ये बदल होणे सामान्य आहे
मासिक पाळीदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन होत असल्याने पोटाच्या खालच्या भागात आणि कमरेत वेदना जाणवू शकतात. काही मुलींना डोकेदुखी, थकवा आणि मूडमध्ये बदल जाणवतात. अशा वेळी पोटावर कोमट पाण्याची पिशवी ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि हलकी शारीरिक हालचाल करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, वेदना असह्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
८. पाळीची तारीख नोंदवून ठेवा
पहिली पाळी आल्यानंतर पुढील काही महिने मासिक पाळी अनियमित असू शकते. त्यामुळे पहिल्या पाळीची तारीख कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवावी. यामुळे पुढील पाळीचे चक्र समजण्यास मदत होते. यासाठी डायरी किंवा पीरियड ट्रॅकिंग अॅपचाही वापर करता येतो.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
मासिक पाळीदरम्यान काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दर एक ते दोन तासांनी पॅड पूर्णपणे भिजत असल्यास, रक्तस्राव सात दिवसांपेक्षा जास्त होत असल्यास किंवा पोटात असह्य वेदना, चक्कर आणि बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच वयाच्या १५ वर्षांपर्यंत पहिली पाळी सुरू झाली नसेल, तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
लक्षात ठेवा, मासिक पाळी ही लाज वाटण्याची किंवा घाबरण्याची गोष्ट नाही. शरीरातील या नैसर्गिक बदलाबद्दल मुलींशी मोकळेपणाने बोलणे आणि त्यांना योग्य माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.





