जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १५ हजार ८०० पैकी १२ हजार ३३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ५ हजार ८९५ पुरुष व ६ हजार ४३६ महिला व २ इतरांनी मतदान केले आहे. जनतेमधून थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) जयदीप बारभाई , शिवसेना (शिंदे गट) दिनेश ऊर्फ विठ्ठल सोनवणे, तर भाजपाचे सचिन सोनवणे आदी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १० प्रभागांतील २० जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना आदी पक्षांचे ५० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे या प्रभाग ३ व ६ मधून भाजपाकडून तर माजी उपाध्यक्ष गणेश निकुडे प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, माजी नगरसेविका अमिना पानसरे प्रभाग ६ अ मधून राष्ट्रवादीकडून आपले नशीब आजमावत आहेत. सर्व जेजुरीवासीयांचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले असले तरी नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मतमोजणी (दि.२१) डिसेंबर रोजी होणार असल्याने उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात प्रमुख लढतीत जेजुरी नगरपरिषदेचा समावेश असल्याने या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.