पुणे – बनावट दस्तावेज तयार करून 76 लाख 18 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तेजस विलास पन्हाळकर आणि विलास लक्ष्मण पन्हाळकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. या प्रकरणात कनक ज्वेलर्सच्या वतीने प्रविण रामचंद्र देवकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. काय आहे प्रकरण? फिर्यादीनुसार, आरोपी तेजस विलास पन्हाळकर, विलास लक्ष्मण पन्हाळकर आणि उज्वला विलास पन्हाळकर यांनी फिर्यादीला बँक लिलावात स्वस्तात दुकाने मिळवून देण्याचे आणि जॉइंट व्हेन्चरमध्ये मालमत्ता विकसित करण्याचे आमिष दाखवले. तसेच, त्यांनी दुकानातून उधारीवर सोने खरेदी केले. यासाठी त्यांनी बनावट सेल सर्टिफिकेट, एमओयु, 7/12 उतारे, इंडेक्स-2, बँकेत पैसे भरल्याच्या खोट्या पावत्या आणि इतर बोगस कागदपत्रे सादर करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या माध्यमातून त्यांनी फिर्यादीला पैसे देण्यास भाग पाडले आणि एकूण 76 लाख 18 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात वाकड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4), 316(2), 236(2), 326, 84(1), 138, 240(2), 351(3) आणि 2(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, परंतु तो फेटाळला गेला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही पुणे सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत तेजस पन्हाळकर आणि विलास पन्हाळकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादींच्या वतीने ॲड. अशोक एम. पठारे, ॲड. रामेश्वर भणगे यांनी, तर मुंबई उच्च न्यायालयात ॲड. सर्वजीत भरतशाम पाटील यांनी काम पाहिले. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यश आले. दरम्यान, या फसवणुकीमुळे फिर्यादींना मोठा आर्थिक फटका बसला असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पोलिस आता पुढील तपास करत असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.