गोकुळकडून दूध संस्थांच्या खात्यावर लवकरच 76 कोटी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दरफरकापोटी 71 कोटी रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर 22 ऑक्टोबर रोजी जमा करणार असल्याची माहीती गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी दिली.
संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दरफरक दिला जातो. त्याप्रमाणे यावर्षी संघाने म्हैस दुधाकरीता 45 कोटी 83 लाख 44 हजार, तर गाय दुधाकरीता 17 कोटी 46 लाख 56 हजार इतका दूध दरफरक आहे.
तर त्यावरील 6% प्रमाणे होणारे व्याज 1 कोटी 89 लाख 90 हजार व डिबेंचर्स व्याज 7.75% प्रमाणे 5 कोटी 56 लाख 45 हजार असे एकूण रुपये 70 कोटी 76 लाख 36 हजार इतकी रक्कम दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बॅंकेत जमा केली जाणार आहे.
मागील वर्षाच्या महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच सगळीकडे पसरत चाललेल्या करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे, साखर कारखाने अडचणीत असताना गोकुळ दूध संघाने खर्चात काटकसर करुन वर्षभर राज्यातील इतर संघांच्या तुलनेत जास्त दर दिलेला आहे.





