सातारा, (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अमृतमहोत्सवी वर्षातील ७४ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवारी (दि. ६) दुपारी एक वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांनी दिली. जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणाऱ्या या बँकेने नाबार्ड , महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध १०८ पुरस्काराने बँकेस गौरविण्यात आले आहे. २०२३- २४ या आर्थिक वर्षात बँकेला उच्चांकी १७९ कोटी ८० लाख करपूर्व ढोबळ नफा तर सर्व तरतुदीनंतर ८५ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. बँकेने मार्चअखेर १०५११ कोटी रुपये इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून निव्वळ एनपीएचे प्रमाण ‘शून्य’ टक्के आहे. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी ग्रामीण विकासाच्या अनेक नवनवीन योजना बॅंकेने राबविल्या असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात बँकेचे मोलाचे योगदान आहे. अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायटया, सचिव इत्यादींंसाठी भरीव तरतूद केलेली आहे. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्यावेळी आर्थिक मदत केली आहे. गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेस आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस असे आवाहन खा. नितिन जाधव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.