चाकण : चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सुरुवातीपासूनच मतदारांची रांग दिसू लागली होती. मतदान केंद्रांवर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. दिवसभर संभाव्य गडबड, तणाव टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. सर्व केंद्रांवर वातावरण शांत, सुरक्षित आणि सुटसुटीत राहिले. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सोय, सूचक फलक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पोलिस व निवडणूक कर्मचारी दिवसभर दक्षतेने काम करत होते. काही ठिकाणी सकाळी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी त्या सुटवल्यानंतर मतदारांनी सुरळीत मतदान केले. दिवसाच्या अखेरीस प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चाकण नगरपरिषदेसाठी एकूण 24,605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदार: 12 हजार 729, महिला मतदार: 11 हजार 876, इतर मतदार: 0 असे एकूण मतदान 24 हजार 605 मतदारांनी हक्क बजावला. एकूण मतदानाचा टक्का: 74.28 टक्के राहिला. मतदानाचा टक्का समाधानकारक असून मागील निवडणुकांच्या तुलनेत मतदारांचा उत्साह कायम राहिल्याचे अधिकारी सांगतात. अनेक मतदान केंद्रांवर महिलांची उपस्थिती विशेषत्वाने जाणवत होती. प्रशासनामार्फत मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती यामुळे यंदाचे मतदान अधिक उत्साही ठरले. चाकण परिसरातील निवडणूक शांततेत, शांतचित्त वातावरणात पार पडल्याबद्दल निवडणूक अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे कौतुक होत आहे. मतमोजणीची उत्सुकता शिगेला मतदान प्रक्रिया पार पडताच आता सर्वांचे लक्ष आगामी २१ तारखेला मतमोजणी प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार आणि समर्थकांत उत्सुकता वाढली असून निकाल कोणाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.