लखनौ: 73व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर प्रदेशमधील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 73 कैद्यांची सुटका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विविध गुन्हांतर्गत दंडाची रक्कम न भरल्याने शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील 73 कैद्यांची सुटका करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असे प्रधान सचिव (गृह) अविनाशकुमार अवस्थी यांनी सांगितले. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व कैद्यांची उद्या स्वातंत्र्य दिनी सुटका करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील मिरुथ, कानपूर, मुरादाबाद, अलिगढ, बरेली, हमीरापूर, चित्रकूट, सुलतानपूर, मिर्झापूर, वाराणसी, मथूरा, अयोध्या, आग्रा, उन्नाव, लखनौ, सितापूर आदिंसह विविध कारागृहात हे कैदी शिक्षा भोगत आहेत.