Nagar News | शिर्डी मतदारसंघासाठी ७३ टक्के मतदान

राहाता, – कुठलाही अनुचित प्रकार न घडता शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी ७३% मतदान झाले आहे. मतदानादरम्यान सात ठिकाणी व्हीव्ही पॅट मशीनमध्ये एरर आल्या कारणाने त्याजागी नवीन व्हीव्ही पॅट लावले होते. एकूण आठ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी मतदानाचे दिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात झाली. शहरी भागात गर्दीत फार वेळ उभे राहायला नको म्हणून सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी नऊ वाजता सुमारे ८.१८% मतदान झाले. दुपारी अकरा वाजेपर्यंत १९.५४%, तीन वाजता ५३.२४ % तर सायंकाळी पाच वाजता ६४.७७ इतके मतदान झाले होते.
दुपारी चारनंतर मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. परिणामी अनेक गावांत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसत होत्या. काही ठिकाणी मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेनंतर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व शारीरिक तंदुरुस्त नसणाऱ्या मतदारांसाठी मतदानकेंद्रस्थळी व्हील चेअरची व्यवस्था व स्वयंसेवक नियुक्त केलेले होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहमतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरीच मतदान केलेले आहे. सखी मतदान केंद्र यासह आदर्श मतदार केंद्र अनेक मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. शिर्डी व राहाता शहरात मतदारांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही मताचा टक्का वाढला असल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू असल्याने शिर्डी मतदारसंघासाठी सरासरी ७३ टक्के मतदान झाल्याचा सायंकाळपर्यंतचा प्राथमिक अंदाज होता.
त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी राहाता तहसील कार्यालयात शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी २० फेऱ्या होणार असून प्रशासन यासाठी सज्ज झाले आहेत.





