७३ टक्के भारतीयांचा पंतप्रधानांवर विश्वास कायम; मात्र चीनविरोधात ठोस भूमिका न घेतल्याचे जनमत

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यातील चिनी सैनिकांसोबत झालेल्या रक्तरंजित झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र असं असलं तरी एका सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील जनतेने मोदी सरकारवर विश्वास दाखवलाय.
सी व्होटर या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली असून या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ७३.६ टक्के भारतीयांनी विरोधी पक्षांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचं म्हंटलं आहे.
सीमेवरील संघर्षानंतर चीनसंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांविषयी सी-व्होटर या संस्थेने एक सर्वेक्षण घेतले होते त्याचाच परिणाम आज जाहीर करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणातील आकडेवारी देशातील जनतेचा पंतप्रधानांवरील विश्वास अबाधित असल्याचं दर्शवत असली तरी चीनच्या कुरापतींना मोदी सरकारने ठोस उत्तर दिले नाही अशी सल देखील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीयांनी व्यक्त केलीये. चीनच्या कुरापतींना मोदी सरकारने ठोस उत्तर दिले का? या प्रश्नाचे उत्तर देताना ६० टक्के देशवासीयांनी नकारात्मक उत्तर दिले आहे.
याखेरीज राष्ट्रीय सुरक्षा हातळण्याबाबत देशाच्या जनतेने राहुल गांधी यांना १४.४ टक्के तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७२.६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या तुलना करताना भारतीय नागरिकांचा कल राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्याकडे जास्त आहे. ६१ टक्के लोकांनी राहुल गांधींवर अविश्वास दाखवला आहे.





