पवनानगर – राजकारण किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात तरुणाईने मुसंडी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमीतकमी वयाचा सरपंच निवडून आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, येळसे ग्रामस्थांनी 70 वर्षे वयाच्या बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर आजींच्या हाती गावचा कारभार सोपवत, गावचा गाडा हाकताना ज्येष्ठांचादेखील अशिर्वाद आवश्यक असल्याचे दाखवून दिले.
मावळ तालुक्यातील येळसे ग्रामपंचायत च्या सरपंचपदी बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच सीमा मुंकुद ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाकरिता मंडल अधिकारी शिवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या एकूण सात सदस्यांपैकी पाच सदस्य उपस्थितीत होते; दोन सदस्य गैरहजर होते. यावेळी बायडाबाई कालेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने दुपारी दोन नंतर निवडणूक अधिकारी एम.एम.चोरमले यांनी कालेकर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी निवडणूक अधिकारी शिवणे मंडल अधिकारी एम.एम.चोरमले, तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक एम. के. चांदगुडे, रामदास कदम यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य सीमा ठाकर, विमल कालेकर, अक्षय कालेकर, सचिन सुतार यांच्यासह माजी सरपंच विजय ठाकर, राष्ट्रवादी माजी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर, गोंविद ठाकर, सुभाष कडू, अमित ठाकर, भाऊ ठाकर, तुकाराम कालेकर, अमित कालेकर, सचिन ठाकर, पांडुरंग घरदाळे, अंकुश गायकवाड, काले सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊ कालेकर, दिलीप कालेकर, संतोष शेडगे,गणेश सातकर,माजी उपसरपंच नीलेश काजळे, संभाजी काजळे, राहुल मोहोळ,निखिल कालेकर आदी उपस्थित होते.यावेळी गुलालाची उधळण करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
असाही योगायोग
पवना धरणासाठी संपादित केलेल्या जागेवर शेवती गाव होते. सन 1972 मध्ये शेवती गावाचे पुनवर्सन येळसे गावातील गायरान मधील काही जागेवर करण्यात आले होते. पंरतु आजपर्यंत शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान मिळाला नव्हता. पंरतु बायडाबाई कालेकर यांच्या रुपाने शेवती वसाहतीला सरपंच पद मिळाले असल्याने शेवती वसाहत पुनवर्सन गावाला सरपंच पद मिळाल्याने ग्रामस्थांनी आंनदात जल्लोष साजरा केला.