रोजव्हॅली गैरव्यवहार प्रकरणी 70 कोटींची मालमत्ता जप्त

शाहरुख खानच्या “केकेआर’शी संबंधित कंपनीसह 3 कंपन्यांवर ईडी’ची कारवाई
नवी दिल्ली : रोज व्हॅली फसव्या योजनांशी संबंधित तपासादरम्यान सक्त वसुली संचलनालयाने आज 70 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये “आयपीएल’मधील अभिनेता शाहरुख खानच्या “कोलकाता नाईट रायडर्स’ या क्रिकेट संघाची मालकी असलेल्या कंपनीच्या मालमत्तांचाही समावेश आहे. मल्टीपल रिसॉर्टस प्रा.लि., कोलकाता सेंट झेवियर्स कॉलेज आणि नाईट रायडर्स स्पोर्टस प्रा.लि. या कंपन्यांवर “ईडी’ने ही कारवाई केली आहे.
रोज व्हॅली समुह आणि अन्य संबंधित कंपन्यांकडून निधी प्राप्त झालेल्या काही व्यक्ती आणि कंपन्यांची 70.11 कोटी रुपयांची स्थावर आणि अचल मालमत्ता “पीएमएलए’कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आली आहे, असे “ईडी’ने म्हटले आहे. या तिन्ही कंपन्यांच्या बॅंक खातीही जप्त केली गेली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 16.20 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातील नाईट रायडर्स स्पोर्टस प्रा.लि. या कंपनीच्या खात्यात 11.87 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
नाईट रायडर्स स्पोर्टसकडे “कोलकाता नाईट रायडर्स’ची मालकी असून या कंपनीवर अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता, केकेआरचे मुख्य कार्यकारी वेंकटेश म्हैसूर आणि अन्य दोघेजण संचालक आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये “ईडी’च्या कोलकाता कार्यालयाने या प्रकरणात म्हैसूर यांची चौकशी केली होती. “ईडी’ने पश्चिम बंगालमधील 24 एकरचा भूखंड, मुंबईतील दिलकाप चेंबर्समधील फ्लॅट, कोलकातातील ज्योती बसू नगरमधील 1 एकराचा भूखंड आणि रोज व्हॅली समुहाशी संबंधित हॉटेलही जप्त केले आहे.
“ईडी’ने 2014 मध्ये “पीएमएलए’ अंतर्गत रोज व्हॅली समूहाचे अध्यक्ष गौतम कुंडू आणि इतरांविरुद्ध “एफआयआर’ नोंदविली आहे. कुंडू यांना 2015 मध्ये अटक करण्यात आली असून सद्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.





