लाखोंची उलाढाल : रानभाज्यांपासून कपड्यापर्यंत सर्वकाही उपलब्ध – टाकवे बुद्रुकच्या आठवडे बाजाराला सात वर्षे पूर्ण, सोमवारच्या बाजारात दोनशे दुकानांची गर्दी, भैरवनाथ मंदिर परिसरात विस्तार टाकवे बुद्रुक – टाकवे बुद्रक गावात आठवडे बाजार सुरू होऊन 7 वर्षे पूर्ण झाली. या बाजारामुळे शेतकरी व ग्राहकांची सुविधा निर्माण झाली. लाखोंची उलाढाल होत असल्याने हा बाजार मावळ तालुक्यात अल्पावधित नवारुपाला आला. आंदर मावळातील 50 गावांमध्ये खमंग निर्माण करणारा बाजार असा नावलौकीक निर्माण केला आहे. टाकवे बुद्रक गाव हे आंदर मावळातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख आहे. किराणा माल, कापड, स्टेशनरी, कटलरी, हॉटेल व्यावसायिक यांचा समावेश होतो. परंतु फळभाज्या, भाजीपाला विक्रेत्यांची कमतरता भासत होती. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांना आठवडे बाजाराच्या खरेदीसाठी वडगाव, तळेगाव, कामशेत याठिकाणी “बाजार हाट’ करण्यासाठी जावे लागत होते. मात्र दळण वळणासाठी होणार खर्च, वेळ वाया जात होता. आंदर मावळातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेतली. टाकवे ग्रामपंचायतीतर्फे माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे व माजी उपसरपंच तानाजी असवले यांनी कार्यकाळात निर्णय घेतला. सन 2013 मध्ये बाजाराचा प्रारंभ केला. या बाजारात सुरवातीला अगदी मोजकेच व्यापारी दुकाने थाटली जात होती. त्यामध्ये हळुहळु वाढ होत गेली. सध्या सरासरी दोनशे दुकाने सोमवारच्या बाजारात असतात. सुरवातीला ग्रामपंचायत कार्यालय ते विठ्ठल रुख्मिणी मंदिरापर्यंत बाजार भरतो. आता भैरवनाथ मंदिर परिसरात बाजाराचा विस्तार झाला आहे. टाकवे बुद्रुक येथे बाजार सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांसह आंदर मावळातील नागरिक समाधानी आहेत. अशी आहेत वैशिष्ट्ये – संख्यात्मक, आर्थिक उलाढाल वाढली शेतकरी ग्राहकांची सोय आंदर मावळातील 50 गावांना फायदा चाकण, म्हाळुंगे, तळेगाव, कडूस, खेड, इंदोरी भागातील व्यापारी …या आहेत त्रुटी – महिला व्यापारी वर्गाला स्वतंत्र स्वच्छतागृह अभाव ग्राहकांना वाहन पार्क करण्यासाठी राखीव जागा नाही फळबाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था बाजाराच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांमुळे मनस्ताप भूई भाड्यात दुप्पट वाढ टाकवे बुद्रुक येथील आठवडे बाजारात गेल्या पाच वर्षांपासून दुकान आहे. या बाजारामुळे चांगली संधी मिळाली आहे. बाजाराला चांगला प्रतिसाद मिळतो, मात्र स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे, अशी प्रतिक्रिया ऋतिक नवघणे या कांदा-बटाटा व्यापाऱ्याने दिली. टाकवे आठवडे बाजारासाठी स्वतंत्र पाणी व्यवस्था केली आहे. महिलांसाठी ग्रामपंचायत शेजारी स्वच्छतागृह कार्यन्वित आहे. जागा उपलब्ध झाल्यास आणखी स्वच्छतागृह उपलब्ध केले जातील. आठवडे बाजारातील दुकानदारांनी सध्या कचऱ्याबाबत सहकार्य करणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया टाकवे बुद्रुकच्या सरपंच सु्प्रिया मालपोटे यांनी दिली.