Naxalites killed – छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये सात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी एका वरिष्ठ नक्षलवादी कॅडरला घेरले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबाराला सुरुवात झाली. यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. बस्तर रेंजचे पोलीस महासंचालक सुंदरराज पी. यांनी या चकमकीची पुष्टी केली आहे. सुरक्षादलांची शोध मोहिम सुरु असताना बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारावाई करण्यात आली. पश्चिम बस्तर विभागातील डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा बटालियनची संयुक्त टीमने कारवाईला सुरुवात केल्यानंतर नक्षलवाद्यांकडून गोळीबाराद्वारे प्रत्युत्तर देण्यात आले. याच भागामध्ये 16 दिवसांपूर्वी सुरक्षादलांनी हिडमाला मारले होते. हिडमानंतर ही बिजापूरमधील दुसरी मोठी चकमक आहे. सर्व युनिट्स परतल्यानंतर या चकमकीची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सुरक्षादलांकडून सांगण्यात आले आहे.