कॉंगोमध्ये संगीताच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

किन्शासा : काँगोच्या राजधानीत शनिवारी एका संगीत मैफलीत झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. किन्शासाच्या मध्यभागी असलेल्या ८० हजार क्षमतेच्या स्टेड डेस शहीद स्टेडियममध्ये ही चेंगराचेंगरी झाली. या स्टेडियममध्ये लोकप्रिय काँगोलीज गॉस्पेल गायक माईक कालाम्बेई याच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे किन्शासाचे गव्हर्नर डॅनियल बंबा यांनी सांगितले.
चेंगराचेंगरीमध्ये किमान ७ जण गुदमरून मरण पावले. तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, असे सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. चेंगराचेंगरी कशामुळे झाली यावर अधिकाऱ्यांनी काहीही भाष्य केले नाही. मात्र या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तथापि, गोंधळ करणाऱ्यांना रोखण्याचा करण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी केला तेव्हा गोंधळ उडाला, असे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्थानिक संगीत व्यवस्थापन कंपनीने सांगितले.
या संगीताच्या कार्यक्रमाला सुमारे ३० हजार प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये इतर अनेक संगीतकार, गायक, वादक आणि धर्मगुरू देखील उपस्थित राहिले होते, असे आयोजक कंपनीने सांगितले. काँगोमध्ये गेल्या काही वर्षांत अशा चेंगराचेंगरीच्या अनेक घटना झाल्या आहेत. अनेकदा बळाचा अतिवापर आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या खराब उपाययोजनांना यासाठी जबाबदार धरले जाते आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये याच स्टेडियममध्ये एका संगीत मैफिलीदरम्यान झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता.





