Airstrike News : इस्रायलने आज लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ७ जण ठार झाले आहेत आणि इतर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम झाला असला, तरी इस्रायलनेआपले हल्ले कमी केलेले नाहीत. इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणेकडील गावांना तेथून निघून जाण्याचा नव्याने इशारा दिला आहे. त्यानंतर आज इस्रायलने हा हवाई हल्ला केला. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये १७ एप्रिल रोजी युद्धविराम झाला आहे. तरी इस्रायल आणि लेबनॉनमधील हिज्बुल्लाहकडून एकमेकांवरचे हल्ले सुरू आहेत. शनिवारी इस्रायलने गेल्या २४ तासात दक्षिण लेबनॉनमध्ये किमान ५० ठिकाणी हवाई हल्ले केले असल्याचे इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्या महिलेने अरबी भाषेत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इस्रायली हवाई दलाने हिज्बुल्लाहशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सदस्यांना लक्ष्य केले, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे किनाऱ्याजवळच्या बायेद गावातल्या एका घरात जमलेल्या इस्रायली सैनिकांना ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा हिज्बुल्लाहने केला आहे. दिनांक २ मार्चपासून इस्रायल आणि हिज्बुल्लाहमधील संघर्ष सुरू असून तेंव्हापासून इस्रायलने हिज्बुल्लाहशी संबंधित शेकडो ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. लेबनॉनच्या सीमेजवळची अनेक गावे ताब्यात घेतली असून हिज्बुल्लाहविरोधात पायदळाची कारवाईही सुरू केली आहे. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तीन दशकांनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चा झाली असून १७ एप्रिल रोजी १० दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली गेली. या युद्धविरामाला नंतर तीन आठवड्यांची मुदतवाढही दिली गेली आहे.