धोतर घातलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारल्याने मॉलवर 7 दिवसांची बंदी

बंगळुरू : बंगळुरूतील जी. टी. मॉलमधील एक व्हिडिओ अलिकडेच व्हायरल झाला होता. त्यात असे दिसून आले होते की धोतर घातलेल्या एका शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला गेला नाही. ही माहिती समोर आल्यानंतर शेतकरी संघटनांनी जोरदार आंदोलन केले. मॉलच्या व्यवस्थापकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याची दखल घेत कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने कारवाई केली असून संबंधित मॉल सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
संबंधित शेतकरी आपल्या मुलासह चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्याला आत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे शेतकरी व त्याच्या मुलाने तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापनाच्या विरोधात गंभीर आरोप केले. केवळ आमच्या कपड्यांमुळे आम्हाला कसा प्रवेश नाकारण्यात आला असे हे दोघे बाप-लेक व्हिडिओत सांगताना दिसत होते.
कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी मॉलच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री बिरथी सुरेश यांनी दिले होते. त्यानुसार सात दिवसांच्या बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ७० वर्षीय शेतकऱ्याचे नाव फकिरप्पा असून त्यांना आणि त्यांच्या मुलाला म्हणजे नागराज यांना तिकिट असूनही प्रवेश नाकारण्यात आला होता. धोतर घालणाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.





