शिर्डी मतदारसंघातील शेतकऱ्यांना 7 कोटींची भरपाई

शिर्डी – शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुका व आश्वी सर्कलमधील एकूण 7 हजार 538 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत स्थानिक आपत्ती पूर्वसूचनेप्रमाणे 6 कोटी 88 लाखांची भरपाई मिळाली आहे. विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरीप हंगाम 2022-23मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये सोयाबीन, मका, बाजरी पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. खरीप हंगामाची सुरुवात झाली असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे या सर्व पिकांना मोठा धोका पोहोचला होता. पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
मतदारसंघातील 7 हजार 538 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. विमा कंपनी आणि कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून पिकांच्या स्थानिक आपत्तीनुसार झालेल्या नुकसानीच्या प्राप्त झालेल्या वैयक्तिक पूर्वसूचनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना 6 कोटी 88 लाख 79 हजार रुपयांची पंतप्रधान पीकविमा योजनेची भरपाई जाहीर झाली असून, शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
मध्यंतरी पीक विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना विमा कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विभाग व विमा कंपन्यांमध्ये योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर तालुक्यातील 7 हजार 538 शेतकऱ्यांना 6 कोटी 88 लाख रुपयांच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाला असून, काढणीपश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सातत्याने शेतकरीहिताचे निर्णय घेतले जात आहेत. आपत्तीच्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
रोहिणी निघुते, सरपंच





