मंचर (पुणे) – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील घोडेगाव आणि परिसरातील चार ग्रामपंचायतींच्या हद्दीत असाणाऱ्या नागरिकांचा करोना संदर्भात महासर्व्हे करण्यात आला. यामध्ये दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून 355 लोकांची रॅपिड ऍन्टिजेन तपासणी केली. यामध्ये एकाच दिवशी 69 लोक करोना पॉझिटिव्ह आले असल्याचे तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
घोडेगाव आणि परिसरातील गावे तपासणीसाठी शुक्रवारी (दि. 11) सुरुवात करण्यात आली. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना घोडेगाव येथे तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांनी प्रशिक्षण दिले. यानंतर आरोग्य तपासणी पथकात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी संशयित सापडलेल्या नागरिकांची त्वरीत ऍन्टिजेन तपासणी करून त्यांच्या अहवालाची पडताळणी करण्यात आली. हे करण्यासाठी घोडेगाव येथील सर्व दुकाने, पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य तपासणी करण्यासाठी 45 पथके, अतिरिक्त 22 कर्मचारी, स्वयंसेवक त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी संशयित आढळलेल्या 355 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यात 69 जण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये घोडेगाव,काळेवाडी-दरेकरवाडी, शिंदेवाडी-धोंडमाळ, आंबेगाव गावठाण या चार गावातील 41 जण आहेत, तर इतर गावांतील 28 नागरिक आहेत.