Sangli News : नॉनव्हेज जेवण पडलं महागात ! वन विभागाच्या 65 जणांना झाली विषबाधा

सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती चिखलदरा येथून पलूस तालुक्यातील कुंडल येथील वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात भेट देण्यासाठी आलेल्या सुमारे 65 प्रशिक्षणार्थींना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झाली. या सगळ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वनप्रशिक्षण केंद्र, चिखलदरा ( अमरावती) येथील 110 प्रशिक्षणार्थी, सहाय्यक आणि इतर अधिकारी 8 असे 118 जण कुंडल येथील वन अॕकेडमीला भेट देण्यासाठी रविवार दि. 23 रोजी संध्याकाळी आले होते. ते 17 फेब्रुवारीपासून संभाजीनगर, जुन्नर, ओझर, बनेश्वर येथील वनउद्यान, इकोबटालीयन प्लांटेशन, रोपवाटीका, बिबट्या उपचार केंद्र व तत्सम ठिकाणी भेट देऊन बनेश्वर ( ओझर) येथून सोमवारी सकाळी निघाले होते. निघताना दुपारच्या जेवणाचे पार्सल बरोबर घेतले होते.
यानंतर सर्वांनी दुपारी रस्त्यामध्ये जेवण केलं. त्यानंतर ते संध्याकाळी कुंडलमध्ये आले येथून आज पुढे राधानगरी इथं जाणार होते.रात्री कुंडल वनप्रभोधिनीमध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी आणि अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण केले. जवळपास पाचशे जणांनी जेवण केले मात्र त्यापैकी फक्त अमरावतीहून आलेल्याच प्रशिक्षणार्थीं पैकी काहींना पहाटे जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. यानंतर त्यांना तातडीने कुंडल आणि पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.





