लोणी काळभोर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवार (3 मार्च) पासून सुरू झाली. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या केंद्रात पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल व कन्या प्रशाला लोणी काळभोर आणि सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल लोणी स्टेशन या चार शाळांमधील 644 परीक्षार्थी परीक्षेस बसले आहेत. त्यांची बैठक व्यवस्था 26 खोल्यांमधून करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली.
आज पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर असल्याने परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षार्थ्यांसमवेत त्यांचे पालक व हितचिंतक परीक्षा केंद्रावर आल्याने गर्दीचे प्रमाण वाढले होते. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करून, तसेच त्यांची पादत्राणे, दप्तर बाहेर ठेवून त्यांच्याकडे मोबाइल नसल्याची खात्री झालेनंतरच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता.