पिंपरी – पतीने वारंवार संशय घेत छळ केल्याने विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पावणे अकराच्या सुमारास सांगवीतील शितोळेनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विवाहितेच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रईस रफिक शेख (रा. शितोळेनगर, सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे व तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे.
त्या आजारी पडल्यानंतरही त्यांच्यावर उपचार केले नाहीत. तसेच वारंवार शिवीगाळ मारहाण करून दबावाखाली ठेवले. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे अधिक तपास करीत आहेत.