नवी दिल्ली -पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे 1990 च्या दशकाच्या प्रारंभी 64 हजार 827 काश्मिरी पंडित कुटूंबांना काश्मीर खोरे सोडणे भाग पडले. ती कुटूंबे जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांत स्थायिक झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात संबंधित माहिती देण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांच्या सर्वांधिक 43 हजार 618 कुटूंबांनी जम्मूत आश्रय घेतला. दिल्ली आणि लगतच्या भागांत 19 हजार 338 कुटूंबे, तर देशाच्या इतर भागांत 1 हजार 995 कुटूंबे स्थायिक झाली. दहशतवादामुळे काश्मीर खोऱ्यातून काही शीख आणि मुस्लिम कुटूंबेही स्थलांतरित झाली. काश्मिरी स्थलांतरितांचे काश्मीर खोऱ्यात पुनवर्सन करण्याच्या उद्देशातून काही पाऊले उचलण्यात आली. त्यातून पंतप्रधान पुनर्निर्माण पॅकेज-2008 अंतर्गत जम्मू-काश्मीर सरकारमध्ये 3 हजार नोकऱ्या उपलब्ध करण्यात आल्या. त्याशिवाय, पंतप्रधान विकास पॅकेज-2015 अंतर्गत अतिरिक्त 3 हजार नोकऱ्यांना मंजुरी देण्यात आली. संबंधित 6 हजार स्थलांतरित काश्मिरी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था म्हणून तितकीच तात्पुरती घरे उभारण्यासाठी 920 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. त्यातून सुमारे 2 हजार 500 सदनिकांचे बांधकाम चालू आहे किंवा पूर्ण झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 1990 च्या दशकाच्या प्रारंभी दहशतवादाने डोके वर काढले. तेव्हापासून 2020 या वर्षापर्यंत दहशतवादाशी संबंधित घटनांत 14 हजार 91 नागरिक मृत्युमुखी पडले. त्या कालावधीत 5 हजार 356 सुरक्षा जवानांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमध्ये 2014 ते 2020 या काळात दहशतवादाशी संबंधित 2 हजार 546 घटना घडल्या. त्यामध्ये 481 सुरक्षा जवान शहीद झाले, तर 215 नागरिक मृत्युमुखी पडले. संबंधित कालावधीत सुरक्षा दलांनी 1 हजार 216 दहशतवाद्यांचा खात्मा केला.