पुणे – विकासकामांपेक्षा वेतनाचा वाढलेला खर्च, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटणारे महापालिकेचे उत्पन्न आणि कोणतेही नवीन आर्थिक स्रोत नसल्याने महापालिकेचे ढासळलेल्या आर्थिक स्थितीचा सामना करत नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी 2020-21 या आर्थिक वर्षांचे सुमारे 6 हजार 229 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना सोमवारी सादर केले.
महापालिकेतील वर्गीकरणे रोखण्यासाठी आणि आयत्या वेळच्या विकासकामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यासाठी राज्य शासनाच्या धर्तीवर यंदापासून डिसेंबरमध्ये पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची घोषणा यावेळी आयुक्तांनी केली. हेच या वर्षाच्या अंदाजपत्रकाचे वेगळेपण ठरले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, शांतनू गोयल यांच्यासह महापालिकेचे विभाग प्रमुख, स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
– 12 टक्के मिळकतकर वाढ, 15 टक्के पाणीपट्टीत वाढ गृहीत
– गतवर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात सुमारे 164 कोटींची वाढ
– उत्पन्नाचे नवीन कोणतेही स्रोत प्रस्तावित नाहीत
– काही रस्ते टू व्हीलरसाठीच विकसित करण्याचा प्रस्ताव
– बीआरटी मार्गांचे ऑडिट करून त्यात दुचाकी वाहनांना प्रवेश
– नदीकाठच्या दोन्ही बाजूला उन्नत रस्ता प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव
मागील वर्षी तत्कालिन आयुक्त सौरभ राव यांनी सुमारे 6 हजार 65 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात सुमारे 164 कोटींची वाढ करत, गायकवाड यांनी आपले अंदाजपत्रक सादर केले. मात्र, यात महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाचे चित्र उमटले असून नवीन योजनांना पूर्णत: कात्री लावण्यात आली आहे. तर या वर्षीही उत्पन्नाचे नवीन कोणतेही स्रोत प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत.
मात्र, अद्याप स्थायी समितीने पुढील आर्थिक वर्षात मिळकतकर वाढीस मान्यता दिली नसली, तरी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 12 टक्के मिळकतकर वाढ तर समान पाणी योजनेसाठी 15 टक्के पाणीपट्टीत वाढ गृहीत धरण्यात आली आहे. याशिवाय, आयुक्तांकडून अंदाजपत्रकात सर्वाधिक भर वाहतूक समस्येवर दिला असून त्यासाठी शहरातील काही रस्ते टू व्हीलरसाठीच विकसित करणे, बीआरटी मार्गांचे ऑडिट करून त्यात दुचाकी वाहनांना प्रवेश देणे, नदीकाठच्या दोन्ही बाजूला उन्नत रस्ता प्रस्तावित करणे, शहरातील रिकाम्या शासकीय जागांचा वापर पार्किगसाठी करणे, शहरातील पीएमपीचे डेपो बाहेर हलवून त्या जागांचा व्यावसायिक वापर वाढविणे, शासकीय जागांमध्ये ई- वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणे अशा संकल्पना गायकवाड यांनी आपल्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर अनेकदा नगरसेवकांना नवीन गरजांनुसार, कामे करता येत नाहीत. त्यामुळे या वर्षीपासून राज्यशासनाच्या धर्तीवर पुरवणी अंदाजपत्रक सादर केले जाईल. उत्पन्नवाढीसाठी लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन नवीन उपाययोजना राबवण्यात येतील. जुन्या कामांना गती देऊन वाहतूक, प्रदूषण, पर्यावरण तसेच नदी प्रदूषण समस्या सोडवण्यास प्राधान्य राहिल.
– शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका