– पं. नेहरू यांचे विचार नवी दिल्ली – मानवी जीवनाचे नियम लक्षात घेऊनच कायदे बनविले पाहिजे. भूतकालीन प्रश्नासंबंधीचे त्यात ऊहापोह असू नये. वर्तमानकालिन समस्याही सोडविण्यास कायदे समर्थ पाहिजेत, असे विचार पंतप्रधान प. नेहरू यांनी व्यक्त केले आहे. येथील विज्ञान भवनात आज सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधीश कॉंग्रेस अधिवेशनात भाषण करताना पंडितजी म्हणाले, “जग बदलत आहे. येथे शाश्वत काही नाही. कायदा करण्यामागचे तत्त्व जुनेच असले तरी नव्या जमान्यात त्यांची अंमलबजावणी करण्याचे पद्धतीत बदल केला पाहिजे. सध्याच्या शीतयुद्धाच्या वातावरणात कायदा व न्यायदानाचा बळी पडला आहे. न्यायमूर्ती व कायदेपंडितही जाणते-अजाणतेपणे, एरवी कदाचित न पटणारी भूमिका घेऊन या वातावरणाचे पोषण करतात. न्यायाधीशांच्या या अधिवेशनाचे उद्घाटन पंडितजींनी केले. समाजाच्या सुसूत्र बांधणीस कायद्याची जरूरी आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून न्यायमूर्ती स्वतंत्र विचाराचे हवेत असे ते म्हणाले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी श्री. व्हिव्हियन बोस हे होते. नाटो संघटना मोडून पडणार कोपनहेगन – रशियाचे मिकोयान यांनी येथे सांगितले की, मी अमेरिकेत जात आहे तो एक स्वतंत्र नागरिक या नात्याने जात आहे. अमेरिकेत स्टेट सेक्रेटरी मि. जॉन फॉस्टर डलेस यांचे बरोबर मी चर्चा करणार आहे. मात्र आमची कोणत्या विषयावर बोलणी होतील ते मला सांगता यायचे नाही. मी डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबर मोकळ्या मनाने वाटाघाटी केल्या. उभयपक्षी कटुता निर्माण करण्यात आली नाही. मात्र डेन्मार्क नाटो संघटनेचा सभासद आहे याचे मला वाईट वाटते. ही नाटो संघटना लवकरच मोडून पडेल. महासागरात ज्वालामुखी मॉस्को – उत्तर अटलांटिक महासागरात पाण्याखाली एक नवीन जिवंत ज्वालामुखी सोव्हिएत सागर-संशोधन मोहिमेत आढळून आला आहे. हा अज्ञात ज्वालामुखी ध्वनीनोंद यंत्राच्या साह्याने शोधून काढण्यात आला. तसेच त्या ज्वालामुखीतून बाहेर फेकण्यात आलेले बरेच साहित्यही सागराच्या तळाशी सोव्हिएत संशोधकांना आढळून आले आहे. अनेक मृत ज्वालामुखीही सोव्हिएत संशोधकांना सागराच्या तळाशी आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी काही 3000 मीटर उंच आहेत. या संशोधनामुळे वरच्या व खालच्या थरात सागर प्रवाहाचा नकाशा बराच सुधारता येईल.