61 वर्षांपूर्वी प्रभात : ता. 20, माहे एप्रिल, सन 1960

स्वातंत्र्य व शांतता अविभाज्य
बेलग्रेड, ता. 19 – भारतीय कॉंग्रेस पक्षाचे चिटणीस सादिक अली यांनी युगोस्लाव्हियातील समाजवादी आघाडीच्या पाचव्या बैठकीत भाषण करताना म्हटले की, आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर राजकीय स्वातंत्र्याला फारसा अर्थ नाही. मानवजातीच्या दृष्टीने शांतता आणि स्वातंत्र्य या गोष्टी अविभाज्य आहेत. जगाच्या एका भागात स्वातंत्र्य आणि दुसरीकडे पारतंत्र असूच शकत नाही. हीच गोष्ट शांततेची आहे. भारत-युगोस्लाव्हिया अनुसरत असलेल्या धोरणाने मनुष्य निर्भयपणे राहू शकेल असे जग निर्माण केले जात आहे.

पुन्हा विश्‍वास निर्माण केला तर मैत्री टिकेल पंडितजींची जाणीव
नवी दिल्ली – उगाच वरवरची शांतता कामाची नाही याची जाणीव होऊन पंडितजी म्हणाले, खरी चित्तशांती मिळाली पाहिजे. विश्‍वास व मैत्रीची भावना पुन्हा निर्माण करण्याचे कार्य अवघड आहे. आपल्या प्रयत्नावरच भविष्य अवलंबून आहे. पंडितजी पुढे म्हणाले, जे झाले त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीनेच आणि शांततेचे वातावरण पुन्हा निर्माण करण्याचे हेतूनेच आमचे प्रयत्न असले पाहिजे. त्यावरच आमची मैत्री विसंबून आहे.

द्विभाषिक विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर झाले
नवी दिल्ली – मुंबई राज्य पुनर्रचनेचे विधेयकावर लोकसभेत सुमारे 7 तास चर्चा होऊन गृहमंत्री पं. पंत यांनी आज समारोप केला आणि नंतर लोकसभेने हे विधेयक मंजूर केले. फक्‍त विदर्भवादी बापूजी अणे यांनीच विरोधी मत नोंदविले. विधेयकावरील चर्चा सर्वसाधारणपणे स्नेहाचे वातावरणात झाली असे पंतांनी वर्णन केलेल्या विधेयकाने सध्याच्या द्विभाषिक मुंबईचे महाराष्ट्र-गुजरात असे दोन राज्ये
1 मे पासून अस्तित्वात येणार आहे.

बेळगावचा प्रश्‍न धसास लावला पाहिजे
नाशिक – येथे भरलेल्या 10व्या महानुभाव परिषदेचे उद्‌घाटन शेतकी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्य स्थापनेचे स्वागत केले. डॉ. देशमुख यांनी बेळगाव आदी मराठी प्रदेश नव्या महाराष्ट्र राज्यात सामील न केल्याबद्दल खेद व्यक्‍त करून “प्रत्यक्ष कृती’ अनिष्ट असली तरी बेळगावचा प्रश्‍न धसाला लावला पाहिजे, असे मत व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.