61 वर्षांपूर्वी प्रभात : नेपाळची इंचभर जमीनही कोणास देणार नाही

नेपाळची इंचभर जमीनही कोणास देणार नाही

खाटमांडू, ता. 20 – नेपाळी सीनेटमध्ये पंतप्रधान बी. पी. कोईराला यांनी असे जाहीर केले की, चिनी नेपाळी सरहद्द चौकशी मंडळ जे नेमवयाचे आहे त्याकडे एव्हरेस्ट शिखराचा प्रश्‍न सोपविण्यात येणार नाही. परंतु चिनी पंतप्रधान जेव्हा येथे येतील तेव्हा मी त्यांच्याबरोबर या प्रश्‍नावर चर्चा करील. विरोधी पक्षाचे समशेर यांनी असे विचारले होते की, एव्हरेस्ट हा नेपाळचा अविभाज्य भाग आहे असे जाहीर करा. त्यावर पंतप्रधान म्हणाले, नेपाळची एक इंचही भूमी दुसऱ्या राष्ट्राला दिली जाणार नाही.

सरकारी घड्याळ कारखान्यात चार लाख घडाळे तयार होणार

नवी दिल्ली – सरकारी मालकीचा घड्याळ कारखाना पूर्णपणे चालू होईल तेव्हा दरवर्षी स्त्रीपुरुषांसाठी असलेली सुमारे साडेतीन ते चार लाख मनगटी घड्याळे तयार होतील. या कारखान्याचे उत्पादन 1962 साली सुरू होईल. अशी माहिती मध्यवर्ती उद्योग खात्याचे मंत्री मनुभाई शाह यांनी सांगितली.

भारत-चीन पंतप्रधानांची चर्चा यशस्वी होऊन तडजोड होवो

बलेबादा – भारत-चीन सीमा तंट्याबाबत भारताचे पंतप्रधान नेहरू व चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांच्या वाटाघाटीस यश योवो अशी मी इच्छा करतो असे सर्वोदयवादी पुढारी जयप्रकाश नारायण यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, भारताच्या सीमेवर आक्रमक चीनला तोंड देण्याची पाळी भारतावर आली आहे. चीनची लोकसंख्या भारताच्या जवळजवळ दीडपट आहे. इतके प्रचंड राष्ट्र वैमनस्याने जवळ असणे हा भारताच्या सुरक्षिततेला फार मोठा धोका आहे.

या दोन राष्ट्रांत मोठा संघर्ष झाला तर त्याचे फार भयंकर परिणाम होतील. तडजोड होणे सोपे नाही. पण ती व्हावी अशी मी प्रार्थना करतो. भारत व चीनमधील संघर्ष दोन संस्कृतीमधील संघर्ष आहे. दोन पद्धतीपैकी आपल्या पद्धतीस आशियात मान्यता मिळावी असा चिनी स्पर्धकांचा हेतू आहे. यापैकी एका पद्धतीचा जय अथवा पराजय यावर या महान खंडाचे भवितव्य अवलंबून आहे. वाटाघाटीतून तडजोड झाली तरी आपण सतत दक्ष असावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.