61 वर्षांपूर्वी प्रभात : आगामी निवडणुकीत खुणांची पद्धत सुरू!

ता. 12, माहे एप्रिल, सन 1960

नवी दिल्ली, ता. 11 – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सर्व देशातच खुणांची पद्धत जारी करणे शक्‍य होईल. काही मागास प्रदेशात कदाचित ते जमणार नाही, अशी माहिती आज लोकसभेत कायदे खात्याचे उपमंत्री हजरनवीस यांनी एका लेखी प्रश्‍नोत्तराद्वारे निवेदन केली. ते म्हणाले, केरळच्या निवडणुकीत या पद्धतीचा अवलंब केल्याने जो अनुभव आला त्याची निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत चर्चा करण्यात आली.

राजकीय पक्ष म्हणून मुस्लीम लीगला मान्यता का?
नवी दिल्ली – निवडणूक मंडळाने मुस्लीम लीगला का मान्यता दिली या संबंधी आज लोकसभेत सवाल करण्यात आला. या सवालास जबाब देताना कायदे खात्याचे उपमंत्री म्हणाले, भारत सरकारचे दृष्टीने या प्रश्‍नाचा विचार करायचा झाला तर कोणत्याही पक्षावर बंदी घालण्यात आलेली नाही हे लक्षात घेतले जाते. निवडणूक कमिशनने मुस्लीम लीगला राज्य पक्ष म्हणून केरळपुरती मान्यता दिली आहे.

प्रत्येक तालुक्‍यात शेतकी मंदिर
सोलापूर – खेड्यांतील शेतकरी संघटित झाल्याशिवाय शेतीचा, शेतकऱ्यांचा व खेड्यांचा विकास होणे शक्‍य नाही या गोष्टीची जाणीव ठेवून सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र शेतकरी संघ स्थापन करण्यात आले. शेतकरी संघाच्या सभासदांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. शेतकरी संघातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी शेतकरी मंदिर उभारण्यास येणार असून तालुक्‍याचे ठिकाणी कोर्टाच्या व इतर कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना उतरण्याची सोय या मंदिरातून करण्यात येणार आहे.

चीनकडून भारताच्या इच्छेचे आणि भूमिकेचे हार्दिक स्वागत
नवी दिल्ली – भारताच्या 12 फेब्रुवारीच्या खलित्याला चीनने 3 एप्रिल रोजी पाठविलेले उत्तर आज लोकसभेपुढे ठेवण्यात आले. या पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या तंग परिस्थितीची कारणे दूर करून भक्‍कम पायावर भारत आणि चीनची मैत्री स्थापन व्हावी, या भारताच्या इच्छेचे आम्ही स्वागत करतो. सीमेच्या कटकटी नाहिशा व्हाव्या या भारत सरकारच्या दृष्टिकोनाचेही आम्ही स्वागत करतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.