पुणे : क्रिकेटच्या सर्वात मोठ्या म्हणजेच कसोटी फॉरमॅटमध्ये असे काही सामने खेळले गेले आहेत जे खूपच छोटे होते. काही सामन्यांचे निकाल लागले तर काही अनिर्णित राहिले.
असाच एक विचित्र कसोटी सामना 1998 मध्ये खेळला गेला होता. जमैकामध्ये खेळल्या गेलेल्या त्या कसोटीत इंग्लंड आणि यजमान वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने होते. आजच्याच दिवशी (29 जानेवारी 1998) त्या सामन्यात असेच काहीसे घडले, ज्यामुळे या सामन्याचा सर्वात लहान सामन्यांच्या यादीत त्याचा समावेश झाला.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदाज कोर्टनी वॉल्शने तिसर्या षटकातील सलग दोन चेंडूंमध्ये अथर्टन आणि मार्क बुचर यांना बाद केले. तर अॅम्ब्रोसने नासेर हुसेनला (1 धाव) बाद केले. इंग्लंडच्या संघाने 9 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.
खेळपट्टी इतकी धोकादायक होती की कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याची भीती वाटत होती. अॅम्ब्रोस आणि वॉल्श हे वेस्ट इंडिजचे दोन बलाढ्य वेगवान गोलंदाज त्यांच्या उंचीचा फायदा घेत हाडे मोडणारे बाउंसर्स टाकत होते. खेळपट्टीवर भेगा स्पष्ट दिसत होत्या. या सामन्यात 3 बाद 17 धावा अशी इंग्लंडच्या संघाची दयनिय अवस्था झाली होती.
खेळपट्टीवरील भेगांमुळे चेंडू खूप उसळी घेत होता. इथेच पंच स्टिव्ह बकनर आणि एस व्यंकटराघवन यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. हा सामना केवळ 61 चेंडूपर्यंत चालला आणि सामना अनिर्णित घोषित करावा लागला. अखेरीस, अॅलेक स्टीवर्टने 26 चेंडूत नाबाद 9 आणि ग्रॅहम थॉर्पने 10 चेंडूत 0 धावा करत खेळपट्टीवर टिकून राहिले.