उजनी धरणातून भीमा नदीत ६० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन
Updated On:

इंदापूर : उजनी धरण साखळीतील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, पूर परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणाच्या १६ दरवाजांमधून भीमा नदीच्या पात्रात ६० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या उजनी धरण १०५.२५ टक्के भरलेले आहे. मंगळवारी सकाळी विसर्ग हळूहळू वाढवण्यात आला.
दुपारी १२ वाजता विसर्ग ६ हजार ६०० क्यूसेकवरून सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात कमी-जास्त बदल होऊ शकतात. यामुळे भीमा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत स्थानिकांना सजग राहण्यास सांगितले आहे.




