पिंपरी – कर्तव्यावर असताना करोनाची बाधा होऊन तीन पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. या पोलिसांच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 12) 60 लाख रुपयांची मदत करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या हस्ते या मदतीचे धनादेश देण्यात आले.
पोलीस आयुक्तालयात झालेल्या या कार्यक्रमास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, करोना सेलचे अधिकारी सहायक निरीक्षक अनिल लोहार आदी उपस्थित होते.
कर्तव्यावर असताना करोनाची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या संतोष प्रताप झेंडे, अंबरनाथ रामचंद्र कोकणे आणि रमेश वामन लोहकरे यांना सरकारने जाहीर केलेली 50 लाखांची मदत तसेच पोलीस कल्याण निधीतून दहा लाख रुपये असा एकूण 60 लाखांचा धनादेश मयत कुटुंबीयांच्या परिवारास देण्यात आला. या पैशांचा वापर आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी करावा, तसेच चांगली गुंतवणूक करावी, असे सल्ला पोलीस आयुक्तांनी मयत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मयत पोलीस कर्मचारी संतोष झेंडे यांची पत्नी मंगल झेंडे व मुलगा तनिष्क झेंडे, मयत पोलीस कर्मचारी अंबरनाथ कोकणे यांची पत्नी सुंदराबाई कोकणे आणि मुलगा प्रदीप कोकणे, मयत कर्मचारी रमेश लोहकरे यांची पत्नी प्रमिला लोहकरे आणि मुलगी समीक्षा लोहकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.