Governor News : मोठी बातमी! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; पाहा संपूर्ण यादी
Governor News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये बदल होणार.

Governor News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सहा राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार ओम प्रकाश माथुर, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, ब्रज मोहन राम, सुधा यादव, ढालसिंग बिसेन आणि दुष्यंत गौतम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त झालेले राज्यपाल संबंधित राज्यात जाऊन पदभार स्वीकारल्यानंतरच या नियुक्त्या लागू होतील. तोपर्यंत सध्याचे राज्यपाल पदावर कायम राहतील.
ओम प्रकाश माथुर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माथुर यांच्याकडे सध्या सिक्कीमच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले माथुर राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. जुलै २०२४ मध्ये त्यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
President of India has appointed new Governors. Om Prakash Mathur has been appointed Governor of Keralam, Rajendra Vishwanath Arlekar as Governor of Tamil Nadu, Braj Mohan Ram as Governor of Odisha, Dr. Sudha Yadav as Governor of Karnataka, Dr. Dhal Singh Bisen as Governor of Uttarakhand, and Dushyant Gautam as Governor of Sikkim.
— IANS (@ians_india) October 12, 2026
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. ते यापूर्वी या राज्याचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. मार्चमध्ये आर. एन. रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर आर्लेकर यांच्याकडे तामिळनाडूची जबाबदारी देण्यात आली होती. ते गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष असून हिमाचल प्रदेश आणि बिहारचे राज्यपालही राहिले आहेत.
ब्रज मोहन राम यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते पलामूचे माजी लोकसभा खासदार आहेत. सुधा यादव यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. त्या महेंद्रगडच्या माजी खासदार असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्य राहिल्या आहेत.
ढालसिंग बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते मध्य प्रदेशातील बालाघाटचे माजी लोकसभा खासदार आहेत.
दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. ते भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार आहेत. या नियुक्त्यांमुळे सहा राज्यांना लवकरच नवे राज्यपाल मिळणार आहेत.
राज्य – राज्यपाल
केरळ — ओम प्रकाश माथुर
तामिळनाडू — राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
ओडिशा — ब्रज मोहन राम
कर्नाटक — डॉ. सुधा यादव
उत्तराखंड — डॉ. ढालसिंग बिसेन
सिक्कीम — दुष्यंत गौतम





