Jammu -Kashmir : जम्मू-काश्मीरमधील अपघातांमध्ये 6 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 3 जवानांचा समावेश

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी घडलेल्या 2 अपघातांमध्ये 6 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये 3 सुरक्षा जवानांचा समावेश आहे. त्याशिवाय, 2 जवान जखमी झाले. कुपवाडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळले. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडलेल्या त्या अपघातात २ जवानांचा जागीच मृत्यू झाला. त्या अपघातात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी लष्कराच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
दुसरा अपघात पूॅंच जिल्ह्यात घडला. प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस रस्त्यावरून घसरून लगतच्या दरीत कोसळली. त्या अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले, तर ४४ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. संबंधित अपघाताची माहिती समजताच स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावून गेले. पाठोपाठ पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे जवानही अपघातस्थळी दाखल झाले.
जखमींना रूग्णवाहिकांमधून नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या दरीत कोसळल्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अपघातांमधील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. दरम्यान, उपचार चालू असलेल्या काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.





