तेलंगणातील चकमकीत 6 नक्षलवादी ठार; 2 महिलांचा समावेश

हैदराबाद – तेलंगणातील चकमकीत गुरूवारी पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलींमध्ये २ महिलांचाही समावेश आहे. संबंधित चकमकीत २ पोलीस कमांडो जखमी झाले. शेजारील छत्तीसगढ राज्यातून नक्षलवाद्यांच्या एका गटाने तेलंगणात प्रवेश केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनी मिळाली. (6 Naxalites Killed in Telangana Encounter )
त्यानंतर तेलंगणा पोलिसांचे विशेष नक्षलवादविरोधी दल असणाऱ्या ग्रेहाऊंडस्च्या कमांडो पथकाने मोहीम हाती घेतली. भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात सकाळच्या सुमारास कमांडो आणि नक्षली आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक झडली.
चकमक थांबल्यानंतर कमांडो पथकाने संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी ६ नक्षलींचे मृतदेह आढळले. ते बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे सदस्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मारल्या गेलेल्या नक्षलींकडील शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये एके-४७ रायफल्स आणि पिस्तुलाचा समावेश असल्याचे समजते.
चकमकीत जखमी झालेल्या दोन्ही कमांडोंना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला कुठला धोका नसल्याची माहिती देण्यात आली. चालू वर्षात सुरक्षा दलांकडून छत्तीसगढमध्ये नक्षलींविरोधात जोरदार मोहिता हाती घेतल्या जात आहेत. त्या मोहिमांमुळे धास्तावून नक्षलींच्या एका गटाने तेलंगणात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.





