गुटख्यासह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव – शहरातील टाकळीनाका येवला रोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करुन तिघा गुटखा विक्रेत्यासह 5 लाख 92 हजार 678 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत धडक कारवाई केली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने अवैध व्यवसायिकांना आळा घालण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आले होते. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहीतीच्या आधारे कोपरगाव शहरातील येवला रोड टाकळी नाका परिसरात एक मारुती व ओमनी गाडीतून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व राम खारतोडे यांच्या मदतीने सापळा रचुन टाकळी नाका परिसरात एक ओमनी व मारुती कार गुटखा घेवून आल्याचे दिसताच पोलिसांनी धरपकड सुरु केली. त्यांना वसिम चॉंदभाई चोपदार (रा. गांधीनगर), राजमल मिश्रीलाल बोथरा (रा. निवारा) व अर्जुन लक्ष्मण शेळके (रा. कोळपेवाडी) हे गुटख्याच्या पोत्यासह मिळून आले.
त्यांच्याजवळ 2 लाख 82 हजार 678 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आदी पदार्थांच्या पुढ्यांचे पोते मिळुन आले.दिड लाखाची ओमीनी गाडी (एम. एच. 14 डी. एम. 5702) व 1 लाख 60 हजाराची मारुती गाडी (एम.एच. 04 सीजे 600) या गाड्या ताब्यात घेतल्या.अन्नऔषध प्रशासनाचे अधिकारी बडे यांनी पकडलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. कारवाईत मनोहर शेजवळ, संदीप घोडके, राहुल साळुंखे,देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संतोष लोंढे, सागर ससाने, रोहित येमुला, रणजित जाधव, उमाकांत गावडे आदींचा समावेश होता.





