मुंबई – मुंबईत करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे मुंबईतील करोनाचा धोका आणखीनच वाढला आहे.
ताज हॉटेलने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बहुतेक कर्मचाऱ्यांची कृतिशील चाचणी घेण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची कोणतीही लक्षण दिसून आली नाही. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे दिसून आली अशा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्याशी संपर्क साधलेल्या इतरांना त्वरित अलग ठेवण्यात आले, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस आणि हॉटेलमध्ये सध्या कोणतेही ग्राहक नसून फक्त मालमत्ता सांभाळण्यासाठी केवळ किमान कर्मचारी हजर असतात, असेही स्पष्ट करण्यात आले.