प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत लोणी काळभोर जिल्हा परिषद गट ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाला असून कदमवाकवस्ती पंचायत समिती गण ‘अनुसूचित जाती’ प्रवर्गासाठी राखीव आहे. तर लोणी काळभोर पंचायत समिती गण ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ यासाठी निश्चित झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर या दोन्ही गटांतून प्रत्येकी 6 इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर लोणी काळभोर जिल्हा परिषद गट ‘अनुसूचित जाती महिला’साठी राखीव घोषित झाला. त्यानंतर विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठी व स्थानिक गटप्रमुखांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या गटातून ज्या 6 महिला उमेदवारांचा सर्वाधिक जोरदार उल्लेख होत आहे, त्या पुढीलप्रमाणे – सोनम ज्ञानेश्वर नामुगडे, शीतल सुजित कांबळे, अॅड. अनिता सुर्यकांत गवळी, सिंपल गणेश कांबळे, पूनम बाबुराव गायकवाड (काळभोर) आणि कलावती अश्रुबा ढेले. या सर्व इच्छुकांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराची चढाओढ सुरू केली असून गटात राजकीय तापमान वाढले आहे.कदमवाकवस्ती पंचायत समिती गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणातून पुढील 6 उमेदवार इच्छूक मानले जात आहेत – नितीन लोखंडे, प्रकाश भिसे, अमोल टेकाळे, कुमार जोगदंड, ज्ञानेश्वर नामुगडे आणि राकेश लोंढे. हे सर्वजण सध्या वैयक्तिक भेटीगाठी, मतदारांच्या चाचपणी आणि स्थानिक पातळीवर संपर्क मोहीम राबवत आहेत. चर्चा गल्ली ते सोशल मीडियापर्यंत पोचली असून उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर झाल्यावर या तीनही गटांतील निवडणूक लढतीत अनपेक्षित वळण येऊ शकते. पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार घोषित केले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांशी काही इच्छुकांचे ‘आतल्या गोटात’ संपर्क सुरू आहेत. परंतु दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. गटातील प्रमुख पुढारीही शांत स्थितीत असल्याने ऐनवेळी नवीन नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणी काळभोर गणात महिलांची टक्कर? ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालेल्या या गणात कुणबी दाखला मिळवलेल्या महिलांमध्ये चुरस अपेक्षित आहे. दोन्ही प्रमुख राजकीय गटांत ‘कोणाला पंचायत समितीची उमेदवारी आणि कोणाला ग्रामपंचायतीची जबाबदारी’ हा समीकरणांचा नीट ताळमेळ साधण्याचा टप्पा सुरू आहे.