Scam News : शहरात रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५६ वर्षीय निवृत्त व्यक्तीची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख द्रविड लक्ष्मण वालिंबा (२२), कावेरी नायडू जाधव (२५) आणि अभिमन्यू सिंग (३५) अशी पटली आहे. संबंधित व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. crime news ही कथित फसवणूक ऑगस्ट २०२४ ते मे २०२५ या कालावधीत घडली. या काळात आरोपींनी फोन कॉलद्वारे आणि तक्रारदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी तक्रारदाराला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवले. तसेच, नोकरीसाठीच्या पात्रता निकषांमध्ये बसण्यासाठी त्याचे वय अॅडजस्ट केले जाईल, असेही त्यांनी त्याला सांगितले होते. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्याला भारतीय रेल्वेचा लोगो असलेले एक बनावट नियुक्ती पत्र पाठवले होते. आरोपींच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने अनेक महिन्यांच्या कालावधीत ऑनलाइन व्यवहार आणि इतर पैसे हस्तांतरण माध्यमांद्वारे आरोपींना एकूण २२ लाख रुपये पाठवले. मात्र, नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन कधीच पूर्ण झाले नाही. आरोपींनी पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली.