शासनाकडेच व्याज सवलतीचे 56 कोटी येणे

नगर – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सन 2019-20 व सन 2020-21 पर्यंतचे व्याज सवलत योजनेंतर्गत सर्व प्रस्ताव मंजुर असून व्याज सवलतीची रक्कम शासनाकडून कर्जदार शेतकरी सभासदांचे बॅंक खाती जमा केली आहे. सन 2021-22 सालातील जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 782 कर्जदार शेतकरी सभासदांचे व्याज सवलत 56 कोटी 9 लाख शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या योजनेंतर्गत शासनाकडून प्राप्त झाली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा वर्ग केली जाते. या रकमेचा गैरवापर झालेला नाही, असा खुलासा जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.
शेतकरी सभासदांनी 3 लाखापर्यंत अल्पमुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास केंद्र शासन 3 टक्के व राज्य शासनाचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 टक्के याप्रमाणे 6 टक्के व्याज सवलत मिळत आहे. शेतकऱ्याची व्याजाची रक्कम पूर्णपणे त्याचे बॅंक खात्यात जमा होवून त्याला शुन्य टक्के व्याजदर पडत आहे. जिल्हा सहकारी बॅंकेत जिल्ह्यातील प्राथमिक वि.का.सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांचे हित जोपासण्यासाठी शासन आदेशाचे नेहमीच पालन करते. यामध्ये सवलतीच्या दरातील कर्जवाटप प्रधानमंत्री फसल विमा योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व एकरकमी कर्ज परतफेड योजना अशा अनेक शासन निर्णयाचा बाबीचा समावेश आहे.
प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना जिल्हा बॅंक राबवित आहे. त्यासाठी बॅंक शेतकऱ्यांच्या विमाच्या हप्ता भरणार आहे. शासनाच्या एक रूपया भरू विमा उतविण्याच्या योजनेची अंमलबजावणी जिल्हा बॅंक करीत असून शेतकरी सभासंदाचे एक रूपया देखील बॅंक भरत आहे. केंद्र शासन व्याज सवलत योजनेंतर्गत नाबार्डकडून सन 2020-21 ची 3 टक्के व्याज सवलत जिल्ह्यातील 2 लाख 27 हजार 902 शेतकऱ्यांची 33 कोटी 56 लाख रक्कम दि. 22 जुलै 2022 रोजी बॅंकेस प्राप्त झाली असून ही रक्कम कर्जदार शेतकरी सभासदांच्या बॅंक खाती जमा केली आहेत. तसेच सन 2021-22 सालाचे 3 टक्के व्याज सवलत प्रस्ताव दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी पाठविला आहे. मात्र 2 लाख 79 हजार 130 शेतकऱ्यांची 32 कोटी 81 लाख नाबार्डकडे प्रस्ताव सादर केलेला असून अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही.
पिक कर्जाचे 86 टक्के वाटप
पिक कर्जाच्या बाबतीत बॅंकेचे कर्जदार राज्यातील इतर बॅंकांच्या तुलनेत सर्वात जास्त असून त्याचा फायदा जिल्ह्यातील प्राथमिक वि.का.सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना मिळतो. दि.21 जुलै 2023 अखेर जिल्हा बॅंकेमार्फत 2 लाख 99 हजार 581 शेतकरी सभासदांना 2 हजार 337 कोटी 82 लाख कर्ज वाटप केले. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाचे 86 टक्के कर्ज वाटप झालेले आहे. अद्याप कर्ज वाटप चालु आहे. जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपात जिल्हा बॅंकेचा 75 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.





