55 मि.मी. पावसाने उडतेय पुणे पालिकेची तारांबळ

पुणे -शहरात प्रतितास 55 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर हे पाणी वाहून नेण्यास या जलवाहिन्या कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेची तारांबळ उडत आहे. तर, दुसऱ्या बाजूला पाहता, 2019 पासून शहरात एखाद्या भागात अचानक अतिवृष्टी सदृश पाऊस होत असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकांच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन बैठक बोलवली होती. या बैठकीत पुणे मनपा प्रशासनाने ही माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात शहरात कमी काळात 30 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला, तरी अनेक रस्त्यांवर पाणी तुंबत आहे. शहरात 2019 पासून जुलै ते सप्टेंबर काळात वारंवार मोठा पाऊस होत आहे. त्यात सर्वाधिक पाऊस टेकड्यांच्या माथ्यावर होत आहे. गेल्या काही वर्षांत दिवसात 180 मिमीपेक्षा अधिक पाऊस तळजाई तसेच शिवाजीनगर परिसरात नोंदविण्यात आलेला आहे. तर अनेकदा एका तासात 55 मिमीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. त्यामुळे कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नगररस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, हडपसर रस्ता या रस्त्यांवर सखल भागात तळी साचत आहेत. या रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या असल्या, तरी त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे अधिक पाऊस झाल्यास रस्त्यांवर तळी साचत आहेत.
रस्त्यांच्या 20 टक्केच पावसाळी वाहिन्या
शहरातील रस्त्यांची लांबी सुमारे 1,500 किलोमीटर असली, तरी पावसाळी वाहिन्या फक्त 260 कि.मी. आहेत. या वाहिन्यांवर सुमारे 58 हजार चेंबर आहेत. मात्र, अनेक भागात रस्ते डांबरीकरण करताना चेंबर बुजविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते चढ-उताराचे असून काही ठिकाणी स्पीड ब्रेकरमुळे सखल भाग तयार झाला आहे. परिणामी, पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने रस्त्यांवर तळी साचत आहेत.
नाले सफाईही होईना
शहराच्या चारही दिशांना असलेल्या टेकड्यांच्या परिसरात नागरिकरण वाढण्यापूर्वी पावसाचे पाणी हे नाले तसेच ओढ्यांमधून वाहून जात होते. शहरात कागदोपत्री 433 नाले असून त्यांची लांबी 625 किलोमीटर आहे. मात्र, हे केवळ कागदावर असून प्रत्यक्षात अनेक नाले बुजविण्यात आले आहेत. तर, काही अतिक्रमणे करून वळविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये न जाता रस्त्यांवर येत असून 55 मिमीपेक्षा कमी पाऊस असला तरी सिमेंट रस्त्यांवर येणारे हे पाणी पावसाळी वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा जादा आहे.





