श्रीरामपूर: भारतीय नौदल दिनाचा ५४ वा वर्धापनदिन श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामपूर तालुका आजी-माजी त्रिदल सैनिक संघटना व माजी पोलीस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहीद स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला. माजी नौदल अधिकारी मेजर अनिल राऊत यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी हुतात्म्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. मेजर राजेंद्र कांदे यांनी नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्यगाथेची माहिती दिली. पोलीस संघटनेचे अध्यक्ष माजी पीएसआय संजय भोंडवे यांनी देशरक्षणामध्ये नौदलाची भूमिका अधोरेखित केली. तसेच मेजर रंजतराव कासार यांनी नौदलातील विविध मोहीम, तांत्रिक क्षमता व किनारपट्टी सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मेजर अनिल राऊत, राजेंद्र कांदे, मनोज राशिनकर, रंजतराव कासार, विजय तोडमल, दत्तात्रय सोनवणे, अनिल लगड, बालासाहेब लांडे, रामदास वाणी, असलम शेख, घनश्याम मिसाळ, मच्छिंद्र शेळके तसेच माजी पीएसआय संजय भोंडवे, राजाराम शिंदे, सरोदे, मकरंद मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते. शहीद स्मारक परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला. सैनिकांच्या शिस्तबद्ध उपस्थितीने वातावरण भारावले. कार्यक्रमाच्या शेवटी मेजर अनिल लगड यांनी आभार मानले व पुढील वर्षी नौदल दिन अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला. नौदल दिनानिमित्त देशाच्या समुद्रसुरक्षेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.