नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी 53.51 टक्के मतदान झाले. अनेक केंद्रांवर निर्धारित वेळ संपल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढेल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यातील 94 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यामुळे 1 हजार 463 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. त्यामध्ये विरोधकांच्या महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणि बिहारमधील चार मंत्र्यांचाही समावेश आहे.
याआधी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान झाले. आता तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उर्वरित जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होईल. पोटनिवडणुकांसाठी मतदारांनी 10 राज्यांत बजावला हक्क
देशातील 10 राज्यांमधील विधानसभांच्या 54 जागांसाठी मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मध्यप्रदेशात सर्वांधिक 28 जागांसाठी मतदान झाले. गुजरातमधील 8 तर उत्तरप्रदेशातील 7 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्याशिवाय, ओडिशा, नागालॅंड, कर्नाटक, झारखंड, छत्तिसगढ, तेलंगण आणि हरियाणात मतदान झाले.